जल है तो कल है
या उक्तीप्रमाणेच पाणी नसेल तर? असा विचार जरी आला तर मनात धडकी भरते. असा काळ आपल्या पुढील पिढीसाठी पर्यायाने आपल्यासाठी येणार नाही याची काळजी तर आपणालाच घ्यायला हवी. पाण्याविणा काय हाल होतात हे तर सगळ्यांनाच माहित आहे.
याचे गांभिर्य लक्षात घेता, आता पाण्याचे महत्वही तेवढेच कळून चुकले आहे. गावागावातून पाण्याची साक्षरता होत आहे. यात मोलाचे काम करत आहे सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सामुहिक श्रमदानातून जलसंवर्धनाच्या कामांना तेल्हारा तालुक्यात सुरुवात झाली आहे. मध्यरात्री 12.00 वाजता स्पर्धेची नियोजीत 8 तारीख सुरू होताच पिवंदळ, वारखेड, गाडेगाव, दानापूर, करी रुपागड, बोरव्हा, चिचारी इत्यादी गावांमध्ये जलसंवर्धनाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. रात्रीची वेळ असुनही गावकऱ्यांनी एकजूटीचे प्रदर्शन करीत मोठ्या संख्येने या सार्वजनिक हिताच्या उपक्रमात हिरीरीने सहभाग घेतला.पहिल्याच दिवशी ओसांडून वाहणारा उत्साह पुढील 45 दिवस संपूर्ण गावकऱ्यांमधे जोश भरणारा नक्कीच असेल. त्यामुळे स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासूनच गावागावांमधे तुफान आल्याशिवाय राहणार नसल्याचे चित्र दिसत आहे. भविष्यासाठी जल बचतीचे उपचार करणारी खेडी आजपासून पुढील 45 दिवस अहोरात्र श्रमदान करणार आहेत.
(सौजन्य : जागर फाउंडेशन)

Comments
Post a Comment